विधानसभा उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे विजय औटींचा अर्ज दाखल, मंत्री दिवाकर रावते, शिंदेंचीही उपस्थिती

Foto

मुंबई – राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक शिवसेनेच्या वतीने आमदार विजय औटी यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला आहे. चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदावर शिवसेनेचे औटी विराजमान होण्याची दाट शक्यता आहे.

 

युती टिकवण्यासाठी भाजपची खेळी

विधानसभा उपसभापती पद चार वर्षांपासून रिक्त आहे. ही जागा शिवसेनेला देऊन भारतीय जनता पक्षाने (भाजप) आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला गळ टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्ते असूनही कायम विरोधकांच्या भूमिकत आहेत. आगामी निवडणुकीतही स्वतंत्र लढण्याचे त्यांनी सुतोवाच केले आहे. त्यामुळे भाजपने काही दिवसांपूर्वीच जाहिर केलेल्या महामंडळ अध्यक्षांच्या निवडीत शिवसेनेला स्थान दिले होते. तसेच चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपसभापती पदाची जागाही भाजपने शिवसेनेला देऊ केली आहे. त्यामुळे ही आगामी निवडणुकीत युतीसाठीची तयारी असल्याचे बोलले जाते.

 
विधानसभेतील बलाबल

विधानसभेत भाजपकडे १२३ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. बहुमत युतीच्या बाजूने असल्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

 

आमदार औटींची लागणार वर्णी

शिवसेनेचे अहमदनगरमधील पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या नावाची या पदासाठी सुरुवातीपासून चर्चा होती.  याशिवाय औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ आणि सुभाष साबणे देखील स्पर्धेत होते. मात्र गुरुवारी शिवसेनेकडून आमदार औटी यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे इतरांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आमदार औटी यांनी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.  


अशी आहे उपसभापती निवडणूक प्रक्रिया 

विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी बुधवारी उपसभापती पदाच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर केला. त्यानुसार गुरुवारी ११.४५ वाजतापर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचे आहेत. येथेच दुपारी १२ पर्यंत अर्जांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी १०.३० पर्यंतची वेळ आहे. उमेदवार स्वतः अथवा त्यांचे अनुमोदक त्यासाठी लेखी सूचना प्रधान सचिवांना देऊ शकतील. एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता विधानसभा सभागृहात मतदान घेतले जाणार आहे.